Saturday, March 2, 2013

खडबडून जागं होण्यासाठी ... ( भाग 1 )


कोणत्याही देशाची संरक्षणयंत्रणा ही एखाद्या वृक्षाभोवती असलेल्या पोलादी कुंपणाप्रमाणे असते.  ते कुंपण कितीही मजबूत असले,  कितीही चकचकीत आणि पक्के दिसत असले तरी ते वाळवीने आतून पोखरलेल्या झाडाला वाचवू शकत नाही. एखादे वादळ त्या सडक्या झाडाला पाडून टाकेल. ज्येष्ठ पत्रकार आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी लिहलेल्या WILL THE IRON FENCE SAVE A TREE HOLLOWED BY TERMITES ? या पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणातले हे  थेट भिडणारं निरीक्षण.  खरं तर या पुस्तकाचे इतके लांबलचक नाव लक्षात ठेवायलाच मला एक दिवस गेला. पूर्वी अशा प्रकारच्या पुस्तकांपासून मी दूर राहत असे, पण हल्ली 'लोकसत्ता' मधील 'बुक - अप' चे संस्कार कळत - नकळत वाचन  माझ्यावर होत आहेत.  लागलेत. त्यामुळे आता अशा लांबलचक नावांच्या पुस्तकांची भीती वाटत नाही. (  सुरुवातीलाच इतके विषयांतर केले  ,ते  देखील हे सदर डोक्यात भिनल्याचा परिणाम आहे. )




             अरुण शौरी यांनी भारतीय सैन्यासमोर 2004 आणि 2006 साली भारतीय सुरक्षेच्या विषयावर भाषण केले होते. या भाषणानंतर  अथक अभ्यास करुन त्यांनी  हे पुस्तक लिहलंय. यातील प्रत्येक शब्दांना अधिकृत कागदपत्रांचा अधार असल्यामुळं त्याची विश्वासहर्ता अधिकच वाढते. निव्वळ बाजारगप्पा  मारणारी किंवा भाबडा आशावाद असलेली अशा  मंडळी आपल्या सभोवती मोठ्या प्रमाणात आढळतात. मात्र  असंख्य अहवाल, कागदपत्रं, भाषणं, संकेतस्थळं, सरकारी कागदपत्र यांचा दाखला देत शौरींनी हे पुस्तक लिहल्यानं यामधील प्रत्येक शब्दाला प्रचंड किंमत आहे.


   या पुस्तकाच्या सुरुवातीलाच सरदार पटेलांनी पंडित नेहरुंना 7 नोव्हेंबर 1950 या दिवशी लिहलेल्या पत्राचा दाखला देण्यात आलाय. या पत्रात सरदार पटेल लिहतात, स्वायतत्ता आणि स्वातंत्र्य याबाबत चीनची व्याख्या वेगळी असावी, त्यामुळे आता तिबेटच्या संबंधात आपण तिबेटशी जे व्यवहार केले आहेत, त्यावर चीन भविष्यात हात वर करेल असे वाटते. चीन आता विभागलेला नसून एक शक्तीशाली देश आहे.चीनी साम्राज्यवादाला रोखण्यासाठी कम्युनिम हे सुरक्षा कवच ठरु शकत नाही. इतिहास आणि वंश याबाबत जवळ असणारे पण आता त्या देशाचा हिस्सा नसलेल्या प्रदेशावर दावा सांगून ते आपल्या देशाला जोडण्याची मागणी चीन नेहमीच करत आलाय. चीनी दाव्याला तत्वज्ञानाचा मुलामा आहे. हा विचारप्रवाह गुप्त असल्यानं तो दहापट धोकादायक आहे. कोणत्याही प्रकारे तो आपल्याशी मित्रत्वाशी जोडलेला नाही. उत्तर आणि ईशान्य दिशेला असलेला चीनी धोका लक्षात घेऊन आपली संरक्षण सज्जता ठेवावी लागेल. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आपण लगेच भेटावे आणि त्यावर योग्य कारवाईचे निर्णय घ्यावे. सरदार पटेलांनी सुचवल्याप्रमाणे कोणतीही बैठक झाली नाही. त्यामुळं नंतर  12 वर्षांनी याची किंमत आपल्या सैनिकांना देशाच्या सेवेसाठी बलिदान करुन मोजावी लागली.

    शत्रूवर विश्वास ठेवण्याची आपली ही 'पृथ्वीराजी' वृत्ती इथचं थांबत नाही. 1971 मध्ये भारताने पाकिस्तानवर न भूतो असा विजय मिळवला. ज्या नेतृत्वानं हा विजय मिळवला त्यांनीच कारारनाम्यातील प्रत्यक्ष ताबारेषेचे आंतरराष्ट्रीय सीमारेषेत रुंपातर करण्याच्या कलमावर झुल्फिकार अली भुत्तोंची स्वाक्षरी न घेताच आपल्या ताब्यातील 93000 पाकिस्तानी सैनिकांची मुक्तता केली. आजपर्यंत आपल्या संरक्षणयंत्रणेला त्याची किंमत मोजावी लागतीय. याच राष्ट्रीय नेतृत्वानं  पंजाबमध्ये भिंद्रानवालेंचा भस्मासूर निर्माण केला. अशाच राजकीय नेत्यांचा गट आपली व्होट बॅँक मजबूत करण्यासाठी आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांना प्रोत्साहन देत असतात. १९८० च्या दशकात काश्मीर खोरे शांत असताना लोकनियुक्त सरकार बरखास्त करुन जमात-ए-इस्लामी आणि इतक पाकिस्तानधार्जिण्या गटांना मोकळे रान उपलब्ध करुन द्यायलाही हाच गट आघाडीवर असतो. मतांचे राजकारण सांभाळण्यासाठी अल्पसंख्यांकाच्या मनात आपणच भिती निर्माण करायची आणि नंतर मतदारांवर भिरकावलेल्या 'अतिरेकी' शब्दात अडकून संरक्षण यंत्रणेच्या हातात असलेले 'टाडा', 'पोटा', 'आर्मड् फोर्सेस स्पेशल पॉवर्स अॅक्ट' हे अस्त्र  याच लोकांनी एकामागोमाग हिरकावून घेतले. सुरक्षा यंत्रणेला सतत त्याची किंमत मोजावी लागतीय.

           पाकिस्तानचे परराष्ट्रसचिव दिल्लीत येऊन हुरियतच्या नेत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अगदी राजरोस भेटतात,. आपले परराष्ट्रसचिव पाकिस्तानला गेले आहेत आणि बलुचिस्तान, सिंध, पख्तुनिस्तान, गिलगीट- बाल्टिस्तान या तेथील फुटीरतावादी चळवळीच्या नेत्याना भेटत आहेत ही कल्पना करणेतरी शक्य आहे का ? हा विरोधाभास आपल्या संयमी संस्कृतीचं लक्षण आहे का ? की आपण गोंधळल्याचे द्योतक ? की आपली लोकशाही असल्याचे चिन्ह ? आपण चुकतो आहोत असे सांगून आपला पुन्हा पुन्हा असा समज करुन देण्यात आला आहे ? २००६ साली शौरींनी लिहलेल्या या पुस्तकात उपस्थित करण्यात आलेले प्रश्न आज २०१३ मध्येही तितके्च ताजे आहेत.

     लाहोर बसयात्रेनंतर भारतामधला मेणबत्ती संप्रदाय जोरदार होता. नवाझ शरीफ यांचा शांततेचे नोबेल देऊन गौरव केला पाहिजे अशी सूचनाही एका संपादकाने केली होती. या उलट पाकिस्तानी वृत्तपत्रे आणि नियतकालिके मात्र त्यांच्या मुजाहिद्दीनांनी आपल्या पवित्र कार्यासाठी काफीरांचा कसा धुव्वा उडवला याचे वर्णन करणा-या बातम्यांनी भरलेली असंत. जी आपल्या वर्तमानपत्रातून कधीही पुन:प्रकाशित होत नाही.

   भावलपूरचा एक साठ वर्षांचा दुकानदार त्याच्या दोन मुलांनी काश्मीरमध्ये लढताना कसा प्राणत्याग केला हे सांगत होता. अबू शाहीदेन असं त्याचं नाव. आवाक होऊन ऐकणा-या एक लाखांपेक्षा जास्त श्रोत्यांसमोर तो म्हणाला,'' पहिला मुलगा काश्मीरमध्ये शहीद झाला तेव्हा मी माझ्या दुस-या मुलाकडे गेलो आणि त्याला सांगितले, 'बेटा आता प्राणत्याग करण्याची तुझी पाळी आहे.' मला सुद्धा शिक्षण मिळाले आहे आणि माझ्या दोन्ही शहीद मुलांना जाऊन मिळावे अशी माझी इच्छा आहे.'' या वेळेपर्यंत उपस्थितांपैकी अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते, श्रोत्यांमधून हुंदक्याचे आवाज ऐकू येत होते. 'द हेरॉल्ड ' या आघाडीच्या पाकिस्तानी नियतकालिकानं जानेवारी १९९८ च्या अंकात जमात-उद-दावा-वल-इर्शादच्या वार्षिक सभेचा अहवाल प्रकाशित केला होता, त्यामधील हे वर्णन आहे.

पाकिस्तानात पावलोपावली अश्या 'जमात' च्या सभा कार्यक्रम होत असतात.त्या कार्यक्रमांची उदाहरणं  देण्यासाठी या पुस्तकातल  एक प्रकरणं  खर्च करण्यात आलंय.. तरुणांना शिक्षणाद्वारे धर्मशिक्षण देत त्यांची मनं जिहादसाठी उत्तेजीत करणे हाच त्यांचा खरा उद्देश असतो. 'लष्कर-ए-तोयबा'  हे अशाच 'शुद्ध झालेल्या तरुणांचे सैन्य' आहे. ज्यात आमीरच्या म्हणजे कमांडरच्या आदेशानंतर केव्हाही कुठेही युद्धासाठी जाण्यास तयार असलेल्या, उच्च लष्करी शिक्षण घेतलेल्या तरुणांना भरती केले जाते. मुंबईवर हल्ला करुन शेकडो निरापराध व्यक्तींची थंड डोक्यानं हत्या करणारे अजमल कसाब आणि त्याचे अन्य नऊ साथीदार हे याच संस्थेचे प्रॉडक्ट.

     आपल्याकडं मुरलीमनोहर जोशी मनुष्यबळ विकासमंत्री असताना इतिहासाचे भगवेकरण सुरु आहे, असा गदारोळ सतत सुरु होता. त्यावरं अनेक चर्चा, लेख, भाषण झाली. जी गोष्ट आपल्याकडं कधीच झाली नाही त्याबद्दल इतका कंठशोष करण्यात आला. पाकिस्तानातली परिस्थिती कशी आहे ? शौरींनी अथक परिश्रम घेत पाकिस्तानी पाठ्यपुस्तकांतील उता-यांचा दस्तावेज या पुस्तकात दिलाय. पंजाब आणि इतरत्र हायर सेंकडरीसाठी असलेल्या तारीख-ई-पाकिस्तान या पुस्तकातला उतारा पहूया - देशाची फाळणी होताच प्रचंड प्रमाणात 'खून की होली' सुरु झाली. मुस्लीम वस्त्यांवर हल्ले करण्यात आले. त्यांच्या गावांना आगी लावण्यात आल्या. आपली घरदारे सोडून  पाकिस्तानात जाण्यासाठी त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात आली. मुस्लीमांनी पाकिस्तान मागितले म्हणून त्यांना शिक्षा करण्यासाठी हिंदूंनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ, लुटमार, बलात्कार, कत्तली करणे सुरु केले,

 1971 च्या युद्धात पाकिस्तान चारीमुंड्या चीत झाले हा जगमान्य इतिहास आहे. पाकिस्तानी पाठ्यपुस्तकांनी  या सुर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ इतिहासालाही  हिरवट रंग दिलाय.  शत्रूच्या संघटना पाकिस्तानात कर्यरत होत्या. दोन्ही देशांत योग्य करार व्हावे अशी हिंदूंची इच्छा नव्हती, लष्कराला कारवाई करावी लागली. द्वेष वाढला. पाकिस्तानी नेतृत्तवात मुत्सेदिगिरीचा अभाव होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर योजनाबद्ध रचना करत भारताने कट रचला, आक्रमण केले. शौर्यानं लढणारे पाकिस्तानी लष्कर वेढले गेले. अनुभवी नेतृत्वाचा अभाव असल्यानं पाकिस्तानी लष्कराला शरण यावे लागले.  सिंध प्रांतामधील आठवीच्या अभ्यासक्रमात असलेल्या ' मु अश्राती अल्म' या पाठ्यपुस्तकात पाकिस्तानच्या पराभवाचे हे असे विखारी वर्णन केल्याचा दाखला या पुस्तकात आहे.

भारत आणि भारतविरोधी भावना असलेली पिढी आता पाकिस्तानात राहिलेली नाही.आता पाकिस्तानचे प्रश्न अशा पिढीच्या हातात आहेत, ज्यांच्या मनात भारताविषयी कोणताही वैरभाव नाही. त्यामुळं आता मैत्रीचा हात पुढं करण्याची वेळ आलीय. असा निधर्मवाद्यांची पुंगी वाजवणा-यांकडून सतत मांडण्यात येणारा   मुद्दा हे सर्व प्रकरण वाचत असताना आपल्याला सतत आठवत राहतो.

                         पाकिस्तान घट्ट पाळमुळं निर्माण करणा-या मदरशांच्या शिक्षणपद्धतीवर शौरींनी प्रकाश टाकलाय.कुरणातील वेगवेगळ्या कलमांची घोकंपट्टी मुलांकडून कशी केली जाते याची अनेक उदाहरणं यात देण्यात आली असून ती मुळातनं वाचण्यासारखी आहेत. 'जहां परींदा भी इजाजत के बिना फडफडा नही सकता अशा  मदरशांच्या जगतात 4 किंवा 5 वर्षांच्या मुलाला सोडण्यात येते. त्यानंतर ही मुलं पुढची दहा ते बारा वर्षे या आदेशांची घोकंपट्टी करत असतो. जे आपल्या धर्माला मानत नाहीत त्यांचा धर्मच पुसून टाकणे ही एकमेव शिकवण यात दिली जाते. या तालिमध्ये तयार झालेल्या विद्यार्थ्यांच्या बॅचेस सध्या जगभर थैमान घालत आहेत. आज पाकिस्तान हे जागतिक दहशतवादाचा कारखाना बनलाय, याचे मुळ याच मदरशांमधील शिकवणीत आहे.

पाकिस्तानमध्ये सुरु असलेला हा खटाटोप केवळ इस्लामीकरणापुरताच मर्यादीत नाही. असं शौरी आपल्याला  ( ्अर्थातच मजबूत दाखल्यांसह ) पटवून देतात. अजूनही पाकिस्तान स्वत:ची ओळख 'जो हिंदुस्थान नाही असा' याशिवाय दुसरी काही असेल याचा विचार करु शकत नाही. संपूर्ण भारतीय उपखंड इस्लामाच्या नावाखाली ताब्यात घेणे हाच त्यांचा मुख्य हेतू आहे.  प्रत्येक प्रत्यक्ष युद्धात भारताकडून मार खावूनही पाकिस्तानी राज्यकर्त्यांना खात्री आहे की ते हिंदुस्थानचे तुकडे पाडू शकतील. या देशात आपण रक्ताचे पाट वाहू शकू. गेल्या 25 वर्षात सतत होणा-या अघोषित युद्धाने पाकिस्ताननं आपल्या सुरक्षा यंत्रणेला जर्जर करुन सोडलंय. त्याबदल्यात त्यांचे अगदी थोडेसेच नुकसान झाले आहे. उलट आपल्या प्रादेशिक एकात्मतेवर प्रचंड ताण पडलाय. त्यामुळे हाजारोंच्या संख्येनं लोक मारले जाऊनही भारत पाकिस्तानवर हल्लाबोल करु शकलेला नाही.

      युद्ध करुन काश्मीर आपल्याला जिंकता येणार नाही, ही बाब पाकिस्तानच्या लक्षात आलीय. त्यामुळे त्यांनी काश्मीरमध्ये आपल्या हस्तकांच्या माध्यमातून अशांतता निर्माण केली. याचा परिणाम म्हणून 1) काश्मीर हा वादग्रस्त भाग आहे. 2) या वादामध्ये पाकिस्तान हा एक बरोबरीचा पक्ष आहे.3 ) हा प्रश्न सोडवायचा असेल तर भारताला पाकिस्तानशी चर्चा करुन तडजोड करावी लागेल या तिन्ही गोष्टी भारतीय नेतृत्वाला मान्य करायला लावण्यात पाकिस्तान यशस्वी ठरलाय.

 काश्मीरमध्ये शांततेची प्रक्रीया सुरु होत आहे. दोन्ही देशातील नागरिक परस्परांच्या जवळ आलेत... याचा जगभर देखावा करण्याची दक्षता घेण्याचं काम पाकिस्तान करत असतो. ही प्रक्रीया सुरु असताना 'शांततेची बोलणी' सुरु ठेवाययची. या बोलणीमध्ये नवनवीन कल्पना मांडण्याची जबाबदारी भारताचीच असेल. असे सांगताना शौरी थेट पाकिस्तानचे निर्माते जीनांचा दाखला देतात. जीना यांनी हीच खबरदारी घेतली होती की प्रत्येकवेळी नवनवीन कल्पना मांडण्याची जबाबदारी काँग्रेसची असेल. या प्रत्येक नव्या प्रस्तावाला पाकिस्तान मिळेपर्यंत त्यांचे - पंडितजींच्याच शब्दात सांगायचे तर 'कायम नकारार्थी उत्तर' होते.

         1971 च्या उलथापालथीनंतरही पाकिस्तानी लष्कर आणि आयहिएसआय यांचे बांगलादेशातील नेटवर्क मजबूत राहिलंय.  जागतिक परिस्थितीमुळं पाकिस्तानात राहणं गैरसोयीची अनेक दहशतवादी बांगलादेश या अभयारण्यात आश्रयाला आहेत. बांगलादेशात अनेक कट्टरवादी संघटना कार्यरत असून या संघटनेच्या दहशतवाद्यांच्या अटकेनंतर त्यांनी दिलेल्या कबूली जबाबातून त्यांच्या व्यापक धोरणांचा खुलासा झालाय.

   या अतिरेक्यांचा कबुलीजबाब आणि भारतीय सुरक्षा संघटनांनी वेळोवेळी प्रसिद्ध केलेले अहवाल यानुसार

1 )  भारतापासून आसाम स्वतंत्र करुन वेगळा मुस्लीम देश स्थापण करणे
2)    बिगर मुस्लीम शक्तींशी लढा देणे
3 )   भारत सरकारशी आणि भारतामधल्या हिंदूंच्या विरुद्ध लढण्यासाठी मुस्लीमांना एकत्र आणणे, भारत सरकारशी सशस्त्र लढा देऊन ईशान्य भारतात इस्लामी राज्याची स्थापणा करणे.

बांगलादेशाच्या लागून असलेल्या जिल्ह्यांचा लोकसंख्येचा समतोल आता पार बिघडलेला आहे. बांगलादेशी घुसखोरांच्या आक्रमणामुळं ईशान्य भारतामधील भौगोलिक दृष्टीनं अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेला प्रदेश आपल्या हातातून निसटण्याची शक्यता आहे. (पश्चिम बंगाल, आसामसह ईशान्य भारतामधील अनेक जिल्ह्यांमधील लोकसंख्येत झालेल्या बदलाची आकडेवारी अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालीय. त्यामुळे ती इथे देणे टाळले आहे. )

  आपल्या सुरक्षा यंत्रणेसमोर तीन मुख्य आव्हाने आहेत. इस्लामिक मूलतत्ववाद, डाव्या गटांचा जहालवाद, आणि ईशान्य भागातील वांशिक मूलतत्ववाद. यातील पहिले धर्माशी संबंधि्त असल्याने त्याबद्दल बोलणे वा लिहणे म्हणजे अब्रहामण्य. दुस-या आव्हानांबद्दल ही 'सरकारी दहशतवादाला' प्रतिक्रीया आहे अशी फॅशनेबल वर्तुळाची समजूत आहे. तिस-या बद्दल स्थानीय जनतेमध्ये जागृती निर्माण झाल्याने, असे होत आहे असा गौरव केला जातो. मात्र या समजुतींच्या पल्याड विचार करणारा चौथा वर्गही या देशात आहे,  या चौथ्या वर्गातल्या प्रत्येकांनी अरुण शौरींचे हे पुस्तक वाचलचं पाहिजे.

                                                                                                                      ( क्रमश:)

   टीप - या पुस्तकात इतकी माहिती आहे, की ती सर्व एकाच ब्लॉगमध्ये देणे मला शक्य नाही. त्यामुळे हा संपूर्ण विषय  काही भागांत ( २ किंवा ३ ) देण्यात येईल.               

4 comments:

हेरंब said...

प्रचंड अप्रतिम !! पुढच्या भागाची वाट पाहतोय आणि पुस्तक ऑलरेडी विशलिस्टमध्ये गेलंय. !

Niranjan Welankar said...

खूप दिवसांनी लेखकाच्या उंचीइतक्या उंचीचा ब्लॉग मिळाला. . . ग्रेट. . . सर्व सहमत आहे. पण सिमला कराराच्या संदर्भात जो उल्लेख आहे तो नियंत्रण रेषेला आंतरराष्ट्रीय सीमा मानली जाण्याचा नसून आंतरराष्ट्रीय सीमेला नियंत्रण रेषा मानली जाण्याचा असावा (युद्ध जिंकल्यानंतर कॉमन सेन्स असल्यास). . . तसं नसेल तर ते भयानक आहे. आणि इतर सर्व गोष्टी आणखी भयानक आहेतच. सावरकर म्हणतात, "शत्रूला शत्रू म्हणून न ओळखणे ही सर्वांत मोठी घोडचूक आहे." आणि आपण तर "एक" राहिलोच नाही आहोत. आपल्यात जय काँग्रेस, जय भीम, लाल सलाम असे सर्व तुकडे तुकडे झालेले आहेत. त्यामुळे परिस्थिती फार भयाण आहे. सर्वच बाबतीत. आणि मूलतत्त्ववादी आक्रमण हे नाझी जर्मनीप्रमाणे/ ब्रिटिशांप्रमाणे आहे. शांतता करार, *** मध्ये दम नसताना केले जातात तसे समझौते- शरण करार करून ते नष्ट होणार नाही. अमेरिका- चीन व मूलतत्त्ववादी ह्यांमध्ये जेव्हा शेवटची (कयामत की) लढाई होईल, तेव्हाच हे अस्मानी संकट संपुष्टात येईल. ते मोडून काढणं आज एका व्यक्तीला/ पक्षालाच काय पण देशालाही शक्य उरलेलं नाही.
शौरीजींचे अभिनंदन! पुढच्या भागाची प्रचंड उत्सुकता लागली आहे आणि 1% अंधुक अपेक्षा आहे, की एक नागरिक म्हणून देशाच्या सुरक्षेसाठी आपण काय करू शकतो, ह्यावर थोडं मार्गदर्शन पुस्तकातून मिळेल. हे सर्व समोर आणून दिल्याबद्दल ब्लॉग लेखकाचे मन:पूर्वक आभार. - वाचक.

Gireesh Mandhale said...

Good post.
After reading this, and many other blogs/books etc; one question pops-up again and again in mind that if we already know so much about the facts, then what is it that is stopping us from finding solution, going ahead and going forward ?? In my opinion, in most cases, if not in every case; the finger could be pointed towards the Government or Political system. The root cause is in the creation of India at the time of freedom. First of all, the power has been transferred from British rulers, not taken. So the people in Power always tried to maintain it. They did not give any new dream or new direction to this country. They only wanted the power. You don't value anything that comes for free! In other words, wrong people got the power.

There is a hidden word "ACT" in "Government of India..act". No one becomes free by an ACT, no one shall. Freedom has to be taken!
There is a popular quote:
"None are more hopelessly enslaved than those who falsely believe they are free."
by Johann Wolfgang von Goethe.

So I think what we as a country are missing is a new identity of our nation in 20th and 21st century. It looks like we have failed to take forward a nation who was so strong culturally, scientifically and in many other aspects. We failed to give us a new identity. We don't know who we are, what we are and what we are looking for.

Nothing is going to happen except debates and discussions until and unless we stand together as a nation leaving all the false identities given to us by political/social systems.

Gireesh Mandhale said...

The last comment was spontaneous reaction to the post.
To elaborate more, the Pakistan or Terrorism are not the only problems we have. Even there is more with these issues. Is there international interest in this region as it is a key area geographically and strategically? Expecting more on this in the next post in series..
The question is how strong and united you are as a nation to face these problems. What is your national identity which rises above all the regional, religious, social and cultural identities?? Do we have such identity? If not, then what is the meaning of "Unity in diversity"?

In my opinion, common man in India is victim of "too much intervention of politics" in daily life. All the daily needs or basic needs are election issues since decades! Is this a mis-use of Democracy? We could not think or be a Nation unless your daily needs are fulfilled.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...