Sunday, August 14, 2011

टीम इंडियाचे वस्त्रहरण


प्रचंड तगडी स्टारकास्ट, अनुभवी आणि नावाजलेला दिग्दर्शक, पाण्यासारखा पैसा खर्च करणारा निर्माता, उत्तम लोकेशन्स, तगडी तंत्रज्ञानाची फौज, आणि प्रसिद्धीपूर्वी ओतलेला पैसा या सा-या गोष्टींद्वारे वातावरणनिर्मीती करता येते. लोकांची उत्सुकताही चाळवता येते. मात्र चित्रपट सुपरहिट होण्यासाठी या सर्वांची एकत्रित भट्टी जमली पाहिजे. नावाजलेले कलाकार आपल्याच प्रतिमेच्या प्रेमात पडून  जर पाट्या टाकणारे काम करु लागले तर ते लगेच उघडे पडतात. त्यांचा चित्रपट फ्लॉप होतो. अशा प्रकारचा चित्रपट मोठी अपेक्षा ठेवून गेलेल्या प्रेक्षकांचा जो मनस्ताप होतो जी चिडचिड होते तशीच माझी अवस्था सध्या झाली आहे.

 गेली 19 महिने  जपलेलं टेस्टमधलं साम्राज्य आता खालसा झालाय. नंबर 1 हा काही कायमस्वरुपी नसतोच. जी टीम आज नंबर 1 वर आहे ती उद्या नंबर 2 वर येणार हे निश्चित असतं. क्रिकेटवर एक दशकांपेक्षा जास्त राज्य करणारे वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया हेही नंबर 1 वरुन पायउतार झाले आहेत. मग  आपल्या पराभवाचं इतकं मनाला का लावू घ्यायचं ? असा प्रश्न एखाद्याला पडू शकतो. पण आपण ज्या पद्धतीनं हरलोय त्याबद्दल या टीमला कधीही क्षमा करता येणार नाही. टेस्टमध्ये नंबर 1 , चार महिन्यापूर्वी वन-डेमधली वर्ल्ड चॅम्पियन असणारी टीम इंग्लंड विरुद्ध बांग्लादेश किंवा झिम्बाब्वेला लाजवेल अशा पद्धतीने हरली आहे.

   आपली कामगिरी किती सुमार आहे. हे भयाण वास्तव जाणून घेण्यासाठी काही आकडेवारी पुरेशी आहे. ( ही आकडेवारी भारत वि. इंग्लंड यांच्यातील पहिल्या 3 टेस्टची आहे. )

         भारताने केलेले रन्स -  1461
        इंग्लंडने केलेले रन्स -  2218  ( इंग्लंड 757 रन्स अधिक )
         भारतीय बॉलर्सनी घेतलेल्या विकेट्स - 41
         इंग्लिश बॉलर्सनी घेतलेल्या विकेट्स - 60 ( इंग्लंड 19 विकेट्सने  म्हणजेच जवळपास दोन  इनिंग जास्त )
           भारतीय बॅट्समनने झळकावलेल्या सेंच्युरी / डबल सेंच्युरी  - 2 /0
           इंग्लंडच्या बॅट्समनने झळकावलेल्या सेंच्युरी/ डबल सेंच्युरी - 5/2
        भारतीय बॅट्समनने झळकावलेल्या हाफ सेंच्युरी -  7
        इंग्लंडच्या बॅट्समनने झळकावलेल्या हाफ सेंच्युरी - 9
   इंग्लंडने आपल्यापेक्षा एक इनिंग कमी बॅटिंग केली आहे अन्यथा हा फरक आणखी वाढला असता.

    बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, मैदानावरचे आणि मैदानाबाहेरचे डावपेच अशा प्रत्येक क्षेत्रात इंग्लंडने आपल्यावर मात केली आहे. वर्ल्ड चॅम्पियन, टेस्टमधली नंबर 1 टीम अशी एकदम रसातळाला कशी जाऊ शकते. ह्या टीमवर काही भानामती तर झाली नाही ना इतक्या टोकच्या अविश्वसनिय पद्धतीनं सध्या आपण हरतोय.

 अवसानघातकी बॅटिंग   -   बलाढ्य बॅटिंग ही टीम इंडियाची सर्वात मोठी शक्ती. याच बॅटिंगच्या जोरावर आपण नंबर 1 झालो. सचिन, सेहवाग, द्रविड, लक्ष्मण सारखे अनुभवी आणि सोबतीला गंभीर, रैना आणि धोनीसारखे आक्रमक युवा बॅट्समन या टीममध्ये आहेत. संपूर्ण क्रिकेटविश्वाला हेवा वाटावा इतकी श्रीमंत बॅटिंग ऑर्डर आपल्याला लाभली आहे.


        पण इंग्लंडमध्ये काय झाले ?  टेस्टमध्ये सर्वात जास्त रन्स करणारे पहिले दोन बॅट्समन ( सचिन, द्रविड )  ज्या टीमममध्ये आहेत. त्या टीमला 6 पैकी एकाही इनिंगमध्ये 300 चा टप्पा पार करता आलेला नाही. सचिन, द्रविड आणि लक्ष्मण या तिघांचे एकत्रित टेस्टमध्ये एकूण 101 सेंच्युरी आहेत. पण या सीरिजमध्ये सचिन- द्रविड, सचिन- लक्ष्मण किंवा द्रविड - लक्ष्मण यांना एकदाही शतकी पार्टनरशिप करता आली नाही.याच भक्कम मीडल ऑर्डरच्या जोरावर आपण गेली 19 महिने राज्य केलं होतं. तीच मीडल ऑर्डर या सीरिजमध्ये अपयशी ठरली आहे. लॉ ऑफ एव्हरेज, किंवा महासेंच्युरीचे दडपण किंवा वेस्ट इंडिज दौ-यावर न जाण्याची चूक कारण काहीही असो सचिनसाठी ही सीरिज निराशाजनक ठरलीय. व्ही.व्ही.एस. लक्ष्मणच्या खेळण्यातील सौंदर्याला इंग्लंडमध्ये क्षणभंगुरतेचा शाप लागलाय. लॉर्डस आणि ट्रेंट ब्रिज टेस्टमध्ये लक्ष्मण चांगलं खेळत असताना अचानक  खराब शॉट मारुन आऊट झाला. एकट्या राहुल द्रविडने पहिल्या दोन टेस्टमध्ये शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्याचीही शिकस्तही अपूरी ठरली.

           वीरेंद्र सेहवाग पहिल्या दोन टेस्ट दुखापतीमुळे खेळू शकला नाही. तिस-या टेस्टमध्ये प्रचंड गाजावाजा करत तो आला आणि लगेच परतला. दोन्ही इनिंग मिळून तो फक्त 8 मिनिटे बॅटिंगसाठी मैदानात होता.      दुस-या इनिंगमध्ये जेंव्हा टीमला त्याची प्रचंड गरज होती. त्यावेळी ह्या नजफगडच्या नवाबाने आपली विकेट खिरापतीमध्ये बहाल केली. जेम्स एण्डरसनचा पहिलाच बॉल तो अगदी उतावळ्या पद्धतीने ( यालाच कौतुकाने सेहवाग स्टाईल म्हंटले जाते )  खेळला. सेहवाग खेळताना बहुधा हे विसरला असवा की स्लिपमध्ये राहुल द्रविड नाही स्ट्रॉस उभा आहे. स्ट्रॉसनं आनंदाने सेहवागचे दान स्विकारले. एजबस्टमध्ये तिस-या दिवशी इंग्लंड प्रचंड भक्कम परिस्थितीमध्ये असताना एलिस्टर कूकने शांतपणे खेळ करत फक्त 3 फोर लगावले . आणि आपले हे साहेब  जणू काही ही T-20 किंवा वन-डे आहे अशा थाटात पहिल्याच बॉलवर फोर मारायला निघाले.संयम आणि दृढनिश्चयाच्या जोरावर इंग्लंडचा सलामीवीर कूकने 294 रन्स काढले. आपला ओपनर सेहवाग उतावळेपणाच्या नादात दोन्ही इनिंगमध्ये पहिल्याच बॉलवर परतला.



 बॉलिंगची बोंब -   कोणतीही टीम नंबर 1 वर टिकण्यासाठी त्या टीमचे बॉलर्स प्रभावी असणे आवश्यक असतं. वेस्ट इंडिज किंवा ऑस्ट्रेलिया या देशांनी दिर्घकाळ राज्य केलं याचं कारण त्यांचे बॉलर्स आहेत. हेच दुस-या शब्दात सांगयच झालं तर एम्ब्रोज, वॉल्श गेल्यानंतर वेस्ट इंडिजची टीम मोडकळीस आली. आणि वॉर्न, मॅग्रा नंतर कांगारुंचा कडेलोट झाला. भारताची बॉलिंग इतकी शक्तीशाली कधीच नव्हती. मात्र झहीर खानच्या अनुपस्थितीमध्ये त्यामधला जीव हरवला. ज्या बॉलर्सनी मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत पहिली टेस्ट हरल्यानंतर कमबॅक केलं होत. ती जिद्द यंदा दिसलीच नाही. हरभजनचा सुमार खेळ सुरुचं होता. लॉर्डसमधला एक स्पेल सोडल्यास ईशांतची जादू  चालली नाही. प्रवीणकुमारनं प्रयत्न केले पण त्यात सातत्य नव्हते. त्यानं या 3 टेस्टमध्ये इतकी बॉलिंग केलीय की तो आता मैदानावर बॉलिंग करताना कधीही पडेल असं वाटू लागलंय. श्रीशांतने ट्रेंट ब्रिजमध्ये पहिल्या दिवशी आशा जागवली. मात्र एजबस्टनमध्ये तो आपण किती भंपक आहोत हे सिद्ध करण्यासाठीच बॉलिंग करत होता. अमित मिश्रा तर नो बॉल टाकणे हा आपला हक्कच आहे अशा पद्धतीनं बॉलिंग करतोय. अमित मिश्रानं आपल्या 12 टेस्टमध्ये 69 नो बॉल टाकले आहेत. तर इंग्लंडच्या सगळ्या बॉलर्सनी एकत्रित मागच्या 11 टेस्टमध्ये 39 नो बॉल टाकले आहेत. केवळ नो बॉलमधला हा फरक दोन टीममधला फरक स्पष्ट करण्यासाठी पुरेसा आहे.


      खराब फिल्डिंग    -      भारतीय क्रिकेट टीमचा जन्म झाला तेंव्हापासून हा रोग आहे. लॉर्डसमध्ये पीटरसन 100 च्या आत असताना त्याचा कॅच आपल्या फिल्डरनं सोडला. पिटरसनने ़डबल सेंच्युरी झळकावली. एजबस्टन टेस्टच्या दुस-या दिवशी द्रविड, सचिन आणि श्रीशांतने मिळून 4 कॅच सोडले. यापैकी सचिननं 165 वर कूकची कॅच सोडली. तर द्रविड आणि श्रीशांतनं मॉर्गनला तो 30 रन्स करण्याच्या आत जीवदान दिलं. कूकनं 294 रन्स काढले. तर वन-डे स्पेशालिस्ट म्हणून ज्याच्यावर शिक्का आहे त्या मॉर्गननेही सेंच्युरी झळकावत भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं. सुमार बॉलिंगवर गलथान फिल्डर्सनी कळस चढवल्यामुळेच इंग्लंडला भक्कम धावसंख्येची इमारत उभी करता आलीय.

  धोनीला काय झाले ? -  

                 टीम इंडियाचा लकी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीसाठी हा सर्वात खडतर दौरा ठरतोय. धोनीच्या कॅप्टनसीखाली पहिल्यांदाच भारतीय टीम टेस्ट सीरिजमध्ये पराभूत झालीय. धोनीच्या कॅप्टनसीमध्ये यापूर्वी भारतीय टीम सलग दोन टेस्ट एकदाही हरली नव्हती. आता पराभवाची हॅटट्रिक झालीय आणि 0-4 असा व्हाईटवॉश होण्याचा धोका आहे. पहिल्या दोन टेस्टमध्ये बॅट्समन म्हणूनही धोनी फ्लॉप   ठरला . धोनीची बॅट ही ब-याचदा शांत असते. पण यशाच्या धुंदीत हे अपयश खपवून घेतलं जायचं. आता या सीरिजपासून धोनीच्या अपयशाचा आवाजही जोरात घुमायला लागलाय. कब तक धोनी ?  यासारखे प्रश्न आता विचारले जाऊ लागलेत. एजबस्टनमध्ये त्यानं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण आता त्याला बॅट्समन म्हणून वारंवार सिद्ध करावं लागेल. पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर बहुतेक काळ बॅटिंग करुनही टेस्टमध्ये 32 सेंच्युरी झळकावणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टीव्ह वॉचा आदर्श धोनीनं ठेवण्याची गरज आहे. स्टीव्ह वॉची  टीमला संकटातून बाहेर काढण्याची कला धोनीने शिकली पाहीजे. अन्यथा कॅप्टन पदासाठी दुसरा समर्थ पर्याय मिळताच त्याची हकालपट्टी निश्चित आहे.

     धोनीची कॅप्टनसीही या सीरिजमध्ये सामान्य होतीय. झहीर खानच्या अनुपस्थितीमध्ये तो अगदीच केविलवाणा वाटतोय.लॉर्डसमध्ये तर पहिल्याच दिवशी घायकुतीला येत त्यानं  बॉलिंग केली. प्रवीण कुमार आणि ईशांत शर्मा हे दोन फास्टर आणि फुसका हरभजन टीममध्ये असल्यामुळे नाईलाजाने त्याला बॉलिंग करण्याचा जुगार खेळावा लागला. मात्र लॉर्डस टेस्टच्या दुस-या इनिंगमध्ये त्यानं रंगात आलेल्या ईशांत शर्माचा स्पेल अचानक बंद केला. ट्रेंट ब्रिजमध्ये तर त्यानं इयान बेलला परत बोलवण्याचं जे अफाट दातृत्व दाखवलं त्यामुळे धोनी मला आता थेट पृथ्वीराज चौहान यांच्या वंशातला वाटू लागलाय. बॅटिंगमधल्या खराब फॉर्मचा परीणाम त्याच्या कॅप्टनसीवर होतोय. मर्यादीत साधनांचा कुशलतेनं वापर करणारा हुशार कॅप्टन अशी त्याची ओळख आहे. मात्र या सीरिजमध्ये धोनीच्या कॅप्टनसीची स्पार्क अजून दिसलाच नाहीयं. टीम फॉर्मात येण्यासाठी धोनीमधला कॅप्टन परत येणंही आवश्यक आहे.

बीसीसीआय कधी बदलणार ?

  भारतीय टीमच्या या फ्लॉप शोचे सर्वात मोठे कारण म्हणजे अतिक्रिकेट.  गल्ली पासून दिल्लीपर्यंतच्या सर्व क्रिकेट विश्लेषकांचे आणि रसिकांचे हेच मत आहे.  वर्ल्ड कपसारख्या सर्वात प्रतिष्ठेच्या आणि मानसिक दृष्ट्या खडतर स्पर्धेनंतर अवघ्या आठवडा भराच्या आता आयपीएलच्या घाणीला भारतीय क्रिकेटपटूंना जुंपले गेले. मार्च आणि एप्रिलच्या उन्हाळ्यात संपूर्ण भारत भ्रमण करणारी ही कंटाळवाणी स्पर्धा खेळाडूंना खेळावी लागली.  जाहीरातदार तसेच फ्रॅंचायझी मालकांच्या दबावामुळे आयपीएलही खेळाडूंसाठी मानसिकरित्या कटकटीची आहे. आयपीएलचा थकवा घालवण्याची संधी काही मोजक्या प्लेयर्सनाच मिळाली. त्यानंतर भारतापेक्षा अगदी भिन्न वातावरण असलेला वेस्ट इंडिजचा दौरा. वेस्ट इंडिज सीरिजनंतर लगेच इंग्लंडची ही प्रतिष्ठेची सीरिज. अवघा एक सराव सामना खेळून भारतीय टीमला लॉर्डसमध्ये टेस्टसाठी उतरावं लागलं.
 
   या अतिक्रिकेटमुळेच भारतीय टीमला दुखापतींचे ग्रहण लागले. झहीर खान, हरभजन, युवराज सीरिजमधून आऊट झाले. वीरेंद्र सेहवाग दोन तर गंभीर एक टेस्ट खेळू शकला नाही. महत्वाच्या मॅचमध्ये झहीर सेहवाग आणि गंभीर नसल्याचा फटका टीमला बसला.इंग्लंड सीरिजमध्ये इतकी ओरड होऊनही बोर्ड धडा घ्यायला तयार नाही. या टेस्ट सीरिजनंतर 1 टी-20 आणि पाच वन-डे मॅचेसची सीरिज खेळून 18 स्पटेंबरला ही खचलेली आणि थकलेली टीम परत येईल. त्यानंतर दुस-याच दिवसापासून म्हणजे 19 स्पटेंबर पासून चॅम्पियन्स लीगला सुरुवात होतीय.सचिन, हरभजन, मुनाफ, धोनी, रैना, आणि विराट कोहली हे प्रमुख प्ले्यर या स्पर्धेत अगदी दुस-या दिवसापासून खेळताना दिसतील.चॅम्पियन लीग संपल्यानंतर लगेच इंग्लंडची टीम भारतामध्ये वन-डे आणि  T-20 खेळण्यासाठी येणार आहे. हा दौरा संपतो न संपतो तोच वेस्ट इंडिज-भारत वन-डे सीरिज आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये टीम इंडियाला आणखी एका खडतर अशा ऑस्ट्रेलिया दौ-यावर जायचे आहे. म्हणजेच इंग्लंड प्रमाणेच ऑस्ट्रेलियातही बॅण्ड वाजावा अशी संपूर्ण व्यवस्था बीसीसीआयनं केली आहे.
     ज्या क्रिकेटपटूंच्या जोरावर हे बोर्ड श्रीमंत झाले. त्याच क्रिकेटपटूंची जराही पर्वा न करणारे बीसीसीआयचे धोरण जोपर्यंत संपणार नाही तोवर टीम इंडियाचे होणारे वस्त्रहरण कोणीही रोखू शकणार नाही.   

4 comments:

अमोल केळकर said...

एका मागे एक हरता दोष ना धोनिचा !

पराजीत आहे जगती संघ भारताचा !!

नागेश देशपांडे said...

मस्त आहे पोस्ट.

गोलंदाजी सुमार दर्ज्याची राहिली या दौ-यात...
कमी आत्मविश्वास, कमी सराव आणि आय.पी.ल. ला दिलेले महत्त्व हीच पराभवाची मुख्य कारणं आहेत.

Niranjan Welankar said...

Namaskar. Jordar lekh ahe. Good to have such long article..... Good... But what about the team????

santosh gore said...

अती क्रिकेटमुळे भारतीय संघ थकला आहे. या संघाला सक्तीची विश्रांती गरजेची आहे.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...